कोरोनाचा केंद्रबिंदू ग्रामीणकडे

Foto
1368 गावांसाठी अवघी 51 आरोग्य केंद्रे स केवळ 108 डॉक्टर्स
गेल्या पाच महिन्यांपासून शहरावर असलेला कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू आता लगतच्या तालुक्यामार्गे ग्रामीण भागाकडे झुकला आहे. काही दिवसांपासून आढळणार्‍या एकूण रुग्ण संख्येपैकी तब्बल पन्नास टक्क्यांहून अधिक रुग्ण ग्रामीण भागात सापडत आहेत. आतापर्यंत तब्बल 6 हजार रूग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.  1 हजार 368 गावे असलेल्या ग्रामीण भागात संसर्ग रोखण्याचे खडतर आव्हान आता जिल्हा आरोग्य यंत्रणेवर आहे. अवघी 51 आरोग्य केंद्रे आणि 108 डॉक्टर्स ही लढाई कशी लढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून शहरात संसर्गाची लागण सुरू झाली. गेल्या पाच महिन्यांच्या काळात रुग्णसंख्या तब्बल 19 हजारावर पोहोचली आहे. प्रारंभी शहराच्या हद्दीत असलेला संसर्ग आता ग्रामीण भागात फैलावला आहे. शहरालगत झालर क्षेत्रातील गावांना प्रारंभी संसर्गाने घेरले. आता दूरवर संसर्ग पोहोचला आहे. काल जिल्ह्यात 237  पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यापैकी महानगरपालिकेच्या हद्दीत 120 तर ग्रामीण भागात तब्बल 117 रुग्ण आढळून आले आहेत. काल सकाळी महानगरपालिकेच्या हद्दीत 35 तर ग्रामीण भागात तब्बल 56 कोरोना आढळून आले आहेत. तर आज मनपात हद्दीत 65 तर ग्रामीण भागात 52 रुग्ण आढळून आले. तब्बल निम्मे रूग्ण आता ग्रामीण भागात आढळत आहेत.
 सर्व तालुक्यांना कोरोनाचा विळखा
औरंगाबाद आणि गंगापूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्याखालोखाल पैठण, सिल्लोड फुलंब्री या तालुक्यांमध्ये ही आता मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
शहरात सुसज्ज घाटी, सिविल हॉस्पिटल यासह सुसज्ज खाजगी दवाखाने उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कोविड केअर सेंटर उभारून महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर बेडची व्यवस्था केली आहे. ग्रामीण भागात मात्र परिस्थिती काहीशी चिंताजनकच म्हणावी लागेल. नऊ तालुक्यांमध्ये 1368 गावांचा विस्तार आणि जवळपास दीडशेहून अधिक किलोमीटरच्या परीघात व्यापलेल्या जिल्ह्यात ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार सेवा पोहोचली जाईल का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात 51 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तर 108 डॉक्टर सेवा बजावत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 57 कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहेत. त्यापैकी 22 सेंटर सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत 6617 बेड तयार ठेवण्यात आले. त्यापैकी 1500 बेड पॉझिटिव रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणावर लागण होत असल्याने चिंता वाढली आहे. मात्र आरोग्य यंत्रणा कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा आरोग्य यंत्रणेवर संसर्गाची लढा देताना इतर सुविधानाही तयार ठेवावे लागते. त्यात लसीकरण मोहीम, डिलिव्हरी स्टाफ यासह डेंग्यू, मलेरिया आदी आजारांसाठी मनुष्यबळ तयार ठेवावे लागत आहे.
 गेल्या दोन तीन महिन्याच्या काळात ग्रामीण भागात 1552 प्रसूती झाल्या आहेत. अशाप्रकारच्या अत्यावश्यक सेवांना दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंडाळ यांनी सांजवार्ताशी बोलताना स्पष्ट केले.
मृत्यू कमी करण्यावर भर : डॉ. गंडाळ
ग्रामीण भागात संसर्गाची लागण वाढल्याने आता 55 वर्षावरील प्रत्येक नागरिकाची टेस्ट करण्याचा निर्णय यंत्रणेने घेतला आहे. त्याचबरोबर सर्दी-खोकला असलेल्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात तीन ते चार कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहेत. खाजगी डॉक्टर तसेच मेडिकल चालकांनाही सूचना देण्यात आल्या असून सर्दी-खोकला अशी लक्षणे असलेल्या संशयित  रुग्णांची नावे आणि मोबाईल नंबर नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गंभीर रुग्णांसाठी ऑक्सीजन बेड तसेच व्हेंटिलेटरची पुरेशी व्यवस्था करण्यात आली असून मृत्यू रोखण्यावर सर्वाधिक भर देण्यात येत आहे.